ढोल-ताशांच्या गजरात पेठे विद्यालयातील पर्यावरणपूरक गणरायाला निरोप
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात यंदाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उत्सवाच्या सांगतेनिमित्त शाळेत सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व सौ. भागवत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विद्यार्थी रत्नाकर प्रभंजन याने गुरु म्हणून पूजेचे विधी पार पाडले.गणेशोत्सवानिमित्त शाळेत अथर्वशीर्ष पठण, पानाफुलांची रांगोळी तसेच पानाफुलांचा गालीचा तयार करणे, आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पानाफुलांच्या रांगोळी स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी तथा पंतप्रधान कृष्णा राजपूत याने प्रथम क्रमांक मिळविला.शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी व शाळेचे माजी विद्यार्थी तथा बांधकाम व्यावसायिक पवन भगूरकर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जन ६ व्या दिवशी करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, पालक शिक्षक संघ पदाधिकारी ज्योती कराड,वर्षा कराड यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
