माध्यमिक विद्यालय उंटवाडी विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशाचे उत्साहात विसर्जन

 माध्यमिक विद्यालय उंटवाडी विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशाचे उत्साहात विसर्जन

अथर्वशीर्ष पठण, रांगोळी स्पर्धा अन् वारकरी पथकाच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयात उपमुख्याध्यापक विजय मापारी यांच्या हस्ते गणपती बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठण, कडधान्य रांगोळी, फुलांची रांगोळी यांसह विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने चारुशीला पत्की, रेखा महिरे, अबोली अकोलकर, रसिका कुलकर्णी, मृण्मयी घैसास, अश्विनी भामरे, संपदा कुलकर्णी, शीतल मोरे आणि राकेश सूर्यवंशी यांनी केले.

गणेश विसर्जनाच्या प्रसंगी विद्यालयाच्या परिसरात ढोल, झेंडा, झांज आणि वारकरी पथकाच्या सादरीकरणामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. माजी विद्यार्थी सागर पाटील यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली.

यावेळी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ, पर्यवेक्षिका मनिषा सावळे आणि शिक्षक प्रतिनिधी मंगला मोरे यांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Previous Post Next Post