🌿 पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा घेऊन दीप महोत्सव साजरा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सहभाग
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक दीप महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या चित्रकला विभागाच्या वतीने करण्यात आले होते. पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ व कला शिक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूं पासून सुंदर, आकर्षक व पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग दिसून आला. तयार केलेल्या आकाशकंदीलांचे प्रदर्शन विद्यालयाच्या परिसरात भरविण्यात आले. यावेळी पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या हस्ते घेतली.
कार्यक्रमावेळी संस्था उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ दीपावली – हरित दीपावली’ या संकल्पनेला उजाळा दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सृजनशीलतेची प्रेरणा निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.