अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेची घोषणा
जळगाव, दि. १७ मे २०२६ :अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे रविवार दि. १७ मे २०२६ रोजी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी, सर्वांगीण विकासासाठी व समाजातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध आदिवासी संघटना, संस्था व मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते आदिवासी समाजाच्या हक्कासाठी कार्य करणारी एकच संघटना म्हणून “अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना” स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री मुकेश भाऊ साळुंके यांची तर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी श्री दिपकभाऊ खांदे (सूर्यवंशी) यांची निवड करण्यात आली.आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश रोखणे, बोगस जात प्रमाणपत्रधारकांविरोधात कारवाई, वनजमिनीवर कसणाऱ्या आदिवासी बांधवांना न्याय, आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांतील गैरव्यवस्था रोखणे, शासकीय सेवेत रिक्त असलेल्या आदिवासी प्रवर्गातील जागा भरणे तसेच आदिवासी समाजाला अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.तसेच आदिवासी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, सांस्कृतिक, उद्योग, शेतकरी, कष्टकरी, मजूर, युवक-युवती, समाजसेवक व समाजसुधारक यांनी मोठ्या प्रमाणात संघटनेत सहभागी होऊन आदिवासी चळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री भगवानसिंग सोळंके, विनोद भाऊ डाबेराव, सुनिल दाभाडे सर, बन्सीलाल पवार, रमेश साळुंके, सुरेश सोनवणे, अंबरसिंग चव्हाण, मोहन भाऊ पारधी, विनोद भाऊ साळुंके, समाधान पवार, चंदकांत साळुंके, सतीश चव्हाण, कृष्णा पारधी, दिनेश भाऊ चव्हाण, संगिता चव्हाण, प्रभावती ताई पारधी, चेतना पवार, संजय साळुंके, शामकांत चव्हाण, रामसिंग चव्हाण यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

