वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पेठे विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा*”
नाशिक (प्रतिनिधी):
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि हरित भविष्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमास विद्यालयाचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उमेश देवरे, महेंद्र गावित यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून,निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा मिळाली. विद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
