सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ उत्साहात

 सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ उत्साहात

दिनांक : १५ जून २०२६ | नाशिक वार्ताहर

नाशिक येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्षा रंजना परदेशी होत्या. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक अशोक शिरुडे तसेच विभाग प्रमुख मनीषा जोशी उपस्थित होते. याप्रसंगी दुपार सत्र प्रमुख नीलिमा गायधनी, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका रेखा क्षीरसागर, सुरेखा बोकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ढोल-ताशांच्या गजरात चॉकलेट व गुलाबपुष्प देऊन, फुलांची उधळण करत, आकर्षक रांगोळी रेखाटून तसेच फुग्यांच्या मनमोहक सजावटीच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण शाळा परिसर प्रसन्न वातावरणाने भारावून गेला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त आणि संस्कार यांचा अंगीकार करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख मनीषा जोशी यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वितरण समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात झाली. नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंद, उत्साह आणि प्रेरणेचा ठरला. 📚🏫🌸🎈🥁

Previous Post Next Post