एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक: 'कायद्याची साक्षरता ही काळाची गरज आहे' हा संदेश घेऊन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी 'विधी साहाय्य आणि जागरूकता' (Legal Aid and Awareness Clinic) उपक्रम राबविला. शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कायद्यांची सोप्या भाषेत माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. आर. कादरी आणि उपप्राचार्य डॉ. एस. के. मांडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. यामध्ये श्री. रोहित अनिल बाविस्कर यांनी 'माहिती तंत्रज्ञान कायदा व त्याचे महत्त्व', श्रीमती साक्षी भारे यांनी 'महिलांचे अधिकार', तर श्री. प्रतीक गायकवाड यांनी 'भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका' समजावून सांगितली.
तसेच, श्रीमती शिल्पा चंद्रमोरे यांनी 'बालकामगार कायदा', श्रीमती वर्षा भोसले यांनी 'शिक्षणाचा अधिकार (RTE)', श्री. स्वप्नील कासारे यांनी 'पर्यावरण संरक्षण कायदा', श्री. भगिरथ बारी यांनी 'मूलभूत हक्क आणि त्याचे महत्त्व' तर श्री. विशाल चव्हाण यांनी 'ग्राहक संरक्षण कायदा' या विषयांवर अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
शालेय वयातच कायद्याची प्राथमिक ओळख व्हावी आणि विद्यार्थ्यांनी आपले हक्क व कर्तव्यांप्रती जागरूक राहावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.
