पेठे विद्यालयात स्त्रीशक्तीचा सन्मान : जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 पेठे विद्यालयात स्त्रीशक्तीचा सन्मान : जागतिक महिला दिन उत्साहात साजरा




महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी ): नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, रविवार कारंजा, नाशिक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भरत भलकार महेंद्र गावित उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील महिला शिक्षिका व कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी दर्शन पुजारी व मयंक बर्वे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत आपले विचार मांडले.शिक्षक मनोगतातून माणिक गोमासे यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षण क्षेत्रातील महिलांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महिला शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत ममता, संयम व संस्कार देतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच दीपक कडाळे यांनी “आई” या कवितेच्या सादरीकरणातून “तूच माझी गुरु, तूच माझी देवता” या ओळींतून मातृत्वाचा गौरव व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे भरत भलकार व महेंद्र गावित यांनी मार्गदर्शन करत स्त्रीशक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड व पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास खंबाइत यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले तर पूनम वाल्हेकर, जयश्री कुलकर्णी, भाऊसाहेब भोंडवे यांनी आभार मानले.कार्यक्रमास विद्यार्थी व गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post