गणवेश हा शिस्त, संस्कार आणि जबाबदारीचे प्रतीक: सरोज जगताप

 गणवेश हा शिस्त, संस्कार आणि जबाबदारीचे प्रतीक: सरोज जगताप 


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नाशिक- आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या काळात पालकांनी पाल्यांना वेळ देणे हीच खरी उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक ठरेल. विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शाळा आणि पालक या दोन्हीही घटकांची आहे. शालेय वयात विद्यार्थ्यांवर संस्कार रुजविता येतात; जे चिरकाल टिकतात. कौटुंबिक पातळीवर मुलगा मुलगी हा भेद नसावा. मुलांना घरात काम करण्याची संधी जाणीवपूर्वक दिली गेली पाहिजे. चांगल्या सवयी जडण्यासाठी मुलांना कृतिशील ठेवा. बालकांच्या वर्तनाचे, शिकण्याचे मानसशास्त्र पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे. कब बुलबुल पथकात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीस प्रोत्साहन दिले जाते. त्यांचा गणवेश हा शिस्त, संस्कार आणि जबाबदारीचे प्रतीक असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (नियोजन) सरोज जगताप यांनी केले. 

    जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय कब बुलबुल उत्सवाच्या समारोप समारंभात उपस्थित कब बुलबुल, कब मास्टर, फ्लॉक लीडर्स, पालक यांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी सरोज जगताप बोलत होत्या. या कब बुलबुल उत्सवात आयोजित चित्रकला, सांस्कृतिक आणि शारीरिक कसरत प्रात्यक्षिक अशा विविध स्पर्धांतील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना याप्रसंगी शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त नवनाथ वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा गाईड प्रशिक्षण आयुक्त डॉ. लक्ष्मी कस्तुरे, जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, कविता वाघ, सेक्रेड हार्ट शाळेच्या व्यवस्थापक थेरेस जॉर्ज, मुख्याध्यापिका टेसी अँटो, बापू चतुर, स्मिता गायकवाड, स्पर्धांचे परीक्षक संदीप भोये, संदीप नागपुरे, धनश्री शिंदे, स्नेहल थोरात आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळ सत्रात या कब बुलबुल उत्सवाची सुरुवात ध्वजारोहणाने नगरसेविका संध्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या जिल्हास्तरीय कब बुलबुल उत्सवात जिल्ह्यातील विविध शाळांतून २८९ कब बुलबुल सहभागी झाले होते.

Previous Post Next Post