माजी विद्यार्थ्याच्या पुढाकाराने 'सीडीओ मेरी'मधील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

 माजी विद्यार्थ्याच्या पुढाकाराने 'सीडीओ मेरी'मधील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीचा सामाजिक उपक्रम; ३६ विद्यार्थिनींना लाभ



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक:येथील प्रसिद्ध सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून गरजू विद्यार्थिनींना ३६ सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि सदर कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले राहुल कळमकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शालेय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र हात्ते होते. "सायकलमुळे विद्यार्थिनींच्या श्रम आणि वेळेत बचत होईल. या बचतीचा वापर त्यांनी अभ्यासासाठी करून आपली प्रगती साधावी, या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवला आहे," असे प्रतिपादन राहुल कळमकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षिका मनिषा सावळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. श्वेता देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्रमुख शरद शेळके व सुनील घोलप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पालक-शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सोनार, ललिता बागुल, भारती भोये यांच्यासह सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ललिता बागुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर भारती भोये यांनी उपस्थितांचे आभार मानले..

Previous Post Next Post