ओझर येथे HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
ओझर (प्रतिनिधी) – प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे आजपासून HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी माता-बाल संगोपन डॉ. हर्षल नेहते, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लोणे व डॉ. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुमारी अन्वीता नितीन संगमनेरे हिला लस देऊन करण्यात आला. तिची आई सौ. जयश्री नितीन संगमनेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे, पीएचएस डॉ. निलेश चव्हाण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद सुर्वे, डॉ. प्राची पवार, डॉ. मंजिरी सराफ यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे ही लस दररोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. लसीकरणासाठी येताना आधारकार्ड, मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक असून पालकांनी मुलींना जेवण करून आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थी मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच लसीकरण करण्यात येणार असून लसीकरणाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
ही लस १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
