ओझर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा पेच कायम; अतिक्रमण आणि जागेच्या वादावर सर्वपक्षीय बैठक

 ओझर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा पेच कायम; अतिक्रमण आणि जागेच्या वादावर सर्वपक्षीय बैठक



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर:

शहराच्या वाढत्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.आमदार निधीतून मंजूर झालेल्या ६ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेवरून यात्रा कमिटी आणि स्थानिक नेते यांच्यात ओढाताण पाहायला मिळाली.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खंडेराव महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक विविध तांत्रिक आणि न्यायालयीन मुद्द्यांमुळे तूर्तास अनुत्तरीतच राहिली.

सायखेडा फाटा परिसरात असलेल्या यात्रा मैदानाच्या कोपऱ्यावर ही इमारत प्रस्तावित आहे.मात्र भविष्यात यात्रेचा विस्तार आणि मैदानाची उपलब्धता लक्षात घेता यात्रा कमिटीने या जागेला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते प्रमोद कुटे यांनी ही जागा मध्यवर्ती असल्याने सोयीस्कर असल्याचे नमूद केले तर रामू पाटील कदम यांनी वाढत्या यात्रेचा विस्तार पाहता ही जागा अपुरी पडेल असा मुद्दा उपस्थित केला.न्यायालयीन अडथळे आणि अतिक्रमणाचे आव्हान करताना प्रस्तावित जागेवर असलेले अतिक्रमण आणि पाठीमागील गाळेधारकांनी मिळवलेली न्यायालयीन स्थगिती हा मोठा अडथळा ठरत आहे.यावर भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी सुवर्णमध्य काढण्याची सूचना मांडत गावात सरकारी जागेची कमतरता आहे. त्यामुळे संबंधित गाळेधारकांशी चर्चा करून त्यांना नवीन इमारतीत गाळे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करू अशी संकल्पना त्यांनी मांडली ज्याला उपस्थित नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

माजी आमदार अनिल कदम यांनी भविष्याचा वेध घेणारा विकास करण्याचा मानस ठेवून मुंबईतील सीएसएमटी स्टेशनचे उदाहरण देत विकासकामे ही पुढील ५० ते १०० वर्षांचा विचार करूनच व्हायला हवीत असे सांगितले.बैठकीनंतर सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.अतिक्रमण आणि न्यायालयीन बाबींवर सकारात्मक तोडगा निघाल्यास इमारतीचे काम मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत मारुती मंदिर परिसरातील मंजूर पुलाबाबतही चर्चा झाली. हा पूल नागेश्वर मंदिर कमान ते मंदिराच्या मागील भागापर्यंत वाढवल्यास दशक्रिया विधी आणि गंधमुक्ती कार्यक्रमांसाठी मोठी जागा उपलब्ध होईल, असा प्रस्ताव समोर आला आहे.

या बैठकीला अनिल कदम,यतीन कदम,नगराध्यक्षा अनिता घेगडमल,गटनेते सुनील कदम,प्रमोद कुटे मुख्याधिकारी किरण देशमुख,सर्वपक्षीय नगरसेवक,विभाग प्रमुख व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो: यतीन कदम यांचे भावनिक आवाहन

महामार्गाचा विस्तार आणि यात्रेसाठी पडणारी जागेची कमतरता लक्षात घेता यतीन कदम यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांच्या स्मारकाचे पूजन करून, स्मारकाची जागा मोकळी करून ती यात्रेसाठी उपलब्ध करून देऊ असे भावनिक आवाहन केले.त्यांच्या या भूमिकेचे सर्व गावकऱ्यांनी स्वागत केले.

Previous Post Next Post