हिमालया वूड बॅज प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिकरोड -
भारत स्काऊट आणि गाईडचे मध्यप्रदेश राज्यातील पंचमढी येथे असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात देशभरातील स्काऊट गाईडच्या पात्र शिक्षकांसाठी आयोजित हिमालया वूड बॅज या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांतील स्काऊट गाईड शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिर नाशिक जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्रात पार पडले. पुढील महिन्यात पंचमढी येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात आयोजित हिमालया वूड बॅज या उच्च स्तरीय प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातून प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले बारा शिक्षक सहभागी होणार आहेत. या सर्व शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या आदेशाने आणि नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातर्फे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मार्गदर्शन शिबिरस्थळी भेट देऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. उपशिक्षणाधिकारी बोडके याप्रसंगी उपस्थित होते. जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त नवनाथ वाघचौरे, जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, कविता वाघ, बद्रीनाथ रायते, साहेबराव पाटील आदींनी सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

