संस्कारांचे सक्षम व्यासपीठ म्हणजे संघस्थान – श्री. विक्रमजी थोरात
पंच परिवर्तन हा केवळ विचार नाही तर जीवन जगण्याचा मार्ग
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंदिरानगर गटातील मोडकश्वर नगर येथील एकलव्य बाल शाखेचा वार्षिक उत्सव आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “संघस्थान हे केवळ खेळाचे मैदान नाही, तर ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारांचे सक्षम व्यासपीठ आहे,” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, नाशिक शहर सहकार्यवाह श्री. विक्रमजी थोरात यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
कार्यक्रमाची सुरुवात पद्याने करण्यात आली. त्यानंतर शाखेत दररोज होणाऱ्या उपक्रमांची झलक प्रात्यक्षिकांद्वारे सादर करण्यात आली. यामध्ये नियुद्ध, दंड क्रिया, योग, सामूहिक समता, घोष, भारतीय पारंपरिक खेळ, मानवी मनोरे तसेच सांघिक पद्धतींचा समावेश होता. या सर्व सादरीकरणातून शिस्त, समन्वय आणि सामूहिकता यांचे उत्कृष्ट दर्शन घडले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गुरु गोविंदसिंह कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. मनोज कोळी यांनी आपल्या उद्गारांत मुलांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. “या लहान वयात इतकी शिस्त आणि आत्मविश्वास पाहून मी प्रभावित झालो आहे. संघाचे कार्य समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे,” असे ते म्हणाले.
श्री. विक्रमजी थोरात यांनी पुढे सांगितले की, संघशताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांद्वारे संघ कार्यकर्ते प्रत्येक वस्तीपर्यंत जाऊन समाजाशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत. या व्यापक कार्यामुळे समाजाकडून संघाला मोठ्या प्रमाणावर प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी पूजनीय तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांचे विचार उपस्थितांसमोर मांडण्यात आले –
“संघाची शाखा ही केवळ खेळ खेळण्याचे किंवा कवायत करण्याचे ठिकाण नाही; तर ती सज्जनांच्या सुरक्षेचे मूक अभिवचन आहे. तरुणांना अनिष्ट व्यसनांपासून दूर ठेवणारे संस्कारपीठ आहे. समाजावर अचानक येणाऱ्या विपत्ती किंवा संकटांच्या वेळी तत्पर, निरपेक्ष मदत मिळण्याचे आशाकेंद्र आहे. महिलांच्या निर्भयतेचे आणि सुसंस्कारित आचरणाचे आश्वासन आहे. दुष्ट तसेच देशद्रोही शक्तींवर आपला धाक प्रस्थापित करणारी शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत योग्य कार्यकर्ते उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम प्रशिक्षण देणारे विद्यापीठ आहे.”
संघाच्या प्रत्येक शाखेचा असा वार्षिक उत्सव होत असतो, ज्यामधून समाजाला शाखेतील कार्याची ओळख करून दिली जाते. संघशताब्दी वर्षानिमित्त समाजजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात येत आहे. यामध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य पालन या मूल्यांचा प्रसार केला जात आहे.
कार्यक्रमास गट कार्यवाह श्री. अनिरुद्ध जोशी, नगर कार्यवाह धनंजय पाठक, एकलव्य शाखा कार्यवाह, मुख्य शिक्षक तसेच इतर स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

