माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या विद्यार्थ्याचा शाळेप्रती कृतज्ञता भाव; तीन पंखे भेट

माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या विद्यार्थ्याचा शाळेप्रती कृतज्ञता भाव; तीन पंखे भेट


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नवीन नाशिक:- येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. चेतन सोनार (इयत्ता १० वी, १९९८ बॅच) यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेला तीन पंखे भेट दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे शालेय परिवारातर्फे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

श्री. चेतन सोनार हे १९९८ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आहेत. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेचा विचार करून, विद्यार्थ्यांनी सुसह्य वातावरणात शिक्षण घ्यावे या उद्देशाने त्यांनी ही मदत केली आहे. त्यांनी हे पंखे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्याकडे सुपूर्द केले.

याप्रसंगी नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी "माजी विद्यार्थी जेव्हा शाळेच्या प्रगतीत किंवा गरजांमध्ये आपला वाटा उचलतात, तेव्हा शिक्षक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या मदतीबद्दल शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी श्री. चेतन सोनार यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

या उपक्रमाची परिसरात चर्चा असून इतर माजी विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे..

Previous Post Next Post