आदिवासी पारधी समाजाच्या अन्यायाविरोधात मुकेश साळुंके यांनी घेतली खा. संजय राऊत यांची भेट
पारधी कन्येच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी; राऊत यांच्याकडून न्यायाचे आश्वासन
मुंबई:
आदिवासी समाजावर होणारे अन्याय-अत्याचार आणि प्रलंबित समस्यांबाबत 'आदिवासी पारधी क्रांती संघटने'चे संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांनी नुकतीच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची 'सामना' कार्यालय, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील रामागड येथील पारधी कन्येच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रामागड येथील कांचन विठ्ठल सोळंके या आदिवासी पारधी समाजाच्या मुलीचा मृतदेह ११ डिसेंबर २०२५ रोजी रामागड तलावात आढळला होता. या घटनेला अनेक महिने उलटूनही अद्याप योग्य कारवाई झाली नसल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन खा. संजय राऊत यांनी यावेळी दिले.
या भेटीदरम्यान मुकेश साळुंके यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात मधील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवरही विस्तृत चर्चा केली. साळुंके हे आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने करत असलेल्या संघर्षाची दखल घेत खा. राऊत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. "मुकेश भाऊ, तुमचे कार्य उल्लेखनीय आहे, शिवसेना आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत," अशा शब्दांत राऊत यांनी त्यांना बळ दिले.
या चर्चेमुळे आता रामागड येथील पारधी कन्येच्या मृत्यू प्रकरणाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, पारधी समाजात न्यायाची आशा पल्लवित झाली आहे.
