गणिताविषयीची अनाठायी भीती आणि समज दूर होण्यास 'गणित गीतानंद' मुळे हातभार लागेल- विशिष्ट आचार्य बाबुराव गवांदे
नाशिकरोड -
गणित विषय काव्यातून प्रकट करणे तसे जटीलच. परंतु ही किमया उपक्रमशील शिक्षक विठ्ठल रहाणे यांनी 'गणित गीतानंद' यांसारख्या अनोख्या गीत संग्रहाच्या माध्यमातून साध्य केली आहे. गणित गीतानंद मुळे गणितासारख्या विषयाचे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. गणित हा विषय अवघड असतो ही अनाठायी भीती आणि समज दूर होण्यास गणित गीतानंदमुळे हातभार लागू शकेल, असे प्रतिपादन विशिष्ट आचार्य बाबुराव गवांदे (संगमनेर) यांनी केले. विठ्ठल रहाणे यांच्यासारख्या उपक्रमशील शिक्षकांची दखल शासनाच्या शिक्षण विभागाकडून घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बारागाव पिंपरी, ता. सिन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल रहाणे यांनी लिहिलेल्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वरबद्ध केलेल्या 'गणित गीतानंद' या गणित विषयावरील गीतसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे सेवानिवृत्त विशिष्ट आचार्य बाबुराव गवांदे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ कळमकर, बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक बागुल, भाऊसाहेब रहाणे, प्रा. नलिनी रहाणे, प्रकाशिका अपूर्वा रहाणे, मराठी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बस्ते आदी प्रमुख मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. नाशिकरोड येथील अपूर्वा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या गणित गीतानंद या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल, त्याच्यातील आशय याबद्दल कवी विठ्ठल रहाणे यांनी आपली भूमिका मांडली. निखिल रहाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य सोमनाथ कळमकर, प्राचार्य अशोक बागुल, भाऊसाहेब रहाणे, प्रा. डॉ. संजय पवार, प्रा. दत्तात्रय फलके, प्रा. अश्विनी दापोरकर, नवनाथ बोराडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचलन केले. उपस्थितांचे आभार प्रा. सुवर्णा रहाणे यांनी मानले.जयराम रहाणे, प्रा. नलिनी रहाणे, अपूर्वा रहाणे, निखिल रहाणे, अंजली रहाणे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
गणित गीतानंद पुस्तकाचे वैशिष्ट्य -
कवी विठ्ठल रहाणे यांचे गणित विषयावरील हे दुसरे पुस्तक. या पुस्तकात गणितातील विविध संबोध आणि संकल्पनांवर आधारित त्यांनी रचलेल्या ७६ गीतांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व गीतांना प्रचलित आरती, जात्यावरील ओवी, भजन, पोवाडा, भारुड, लावणी, गण, अभंग, भावगीत अशा विविध रचनांच्या चाली कोणताही गायक, स्टुडिओ यांचा वापर न करता केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या आधारे कवी विठ्ठल रहाणे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून साकारलेल्या आहेत. अशा प्रकारचा गणित विषयावर आधारित शैक्षणिक क्षेत्रातील गणित गीतानंद हा पहिलाच गीतसंग्रह ठरला आहे.
