ज्ञानदीप प्रज्वलित: पेठे विद्यालयात ग्रंथ सप्ताहाचा उत्साहपूर्ण शुभारंभ
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा – नाशिक :
दीपप्रज्वलनाने शुभारंभ
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. रोटवदकर मॅडम व गीतमंचातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण आनंदमय झाले.
मुख्याध्यापक मा. गंगाधर बदादे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. अतिथी परिचय शिनकर संदीप सर यांनी करून मान्यवरांची कार्यपरंपरा तसेच वाचनाशी असलेली त्यांची नाळ विशद केली.
‘ग्रंथ हेच खरे गुरु’ – प्रमुख अतिथी
प्रमुख अतिथी मा. कैलास पाटील (माजी मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना—
“ग्रंथ हेच खरे गुरू असून वाचनातून मनुष्य स्वतःला सतत अद्ययावत ठेवतो,” असे प्रतिपादन केले.
संस्था सहकार्यवाह मा. शैलेश पाटोळे यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टी प्रदान करतो, असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत देवदत्त जोशी सर यांनी व्यक्त केले. आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक मा. शरद शेळके यांनी केले, तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन जयश्री कुलकर्णी मॅडम यांनी पार पाडले.
या प्रसंगी पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, ग्रंथपाल पल्लवी मोहिते (चव्हाण) यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
नृत्य, जीवनपट व सर्जनशीलतेची मेजवानी
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण व जीवनपट सादर केले. या सादरीकरणांना कल्पना खालकर व सोनाली चिंचोले मॅडम यांनी उत्तम मार्गदर्शन केले. स्तुतीगीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य विशेष भावपूर्ण ठरले.
रूपाली ठाकूर यांनी स्टेजवर काढलेल्या आकर्षक रांगोळीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला कलात्मक शोभा प्राप्त झाली. उद्घाटनानंतर ग्रंथदर्शन प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान, इतिहास, कथा, काव्य, बालसाहित्य आदी पुस्तकांचा आवडीने आस्वाद घेतला. काही विद्यार्थ्यांनी ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावर अनुभव मांडले.
आकर्षक उपक्रमांची रेलचेल
ग्रंथ सप्ताहात दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत—
- वाचन उपक्रम
- पुस्तक परीक्षण
- चित्रकला स्पर्धा
- स्मरणशक्ती स्पर्धा
- पुस्तक परिचय
- पेठे स्कॉलर स्पर्धा
- ग्रंथालय भेट
वाचनाची सवय वाढीस लागावी, पुस्तकांविषयी कुतूहल जागृत व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
ज्ञानदीप तेजोमय…
सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात ग्रंथ सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून ज्ञानदीप प्रज्वलित करणारी ही वाटचाल संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे.
