वकिलांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व वकील संरक्षण कायदा तातडीने पारित करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी ठराव पारित केला.
या ठरावानुसार आज, 3 नोव्हेंबर 2025 रोजी, पिंपळगाव बसवंत वकील संघाच्या सदस्यांनी लाल फिती लावून न्यायालयीन कामकाज पार पाडले.
वकील वर्गाने शासनाकडे वकील संरक्षण कायदा त्वरित पारित करून वकिलांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. अलीकडील काळात वकिलांवर पक्षकारांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा राबविण्याची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे.
वकील न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करतात, मात्र न्यायनिर्णय एका पक्षाच्या बाजूने गेल्यास गैरसमजुतीमुळे काही पक्षकार वकिलांवर हल्ले करतात, ही बाब अत्यंत निषेधार्ह असल्याचे वकील संघाने म्हटले आहे.
वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा, जेणेकरून अशा घटनांना आळा बसून वकिलांच्या जीविताचे रक्षण होईल, अशी मागणी सर्व वकील संघटनांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात पिंपळगाव बसवंत वकील संघाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलेले आहे.
