ओझरची दोनशे वर्षांहून अधिक जपलेली परंपरा : अश्व मिरवणूक, मल्हार रथ आणि खंडेराव महाराजांची चंपाषष्ठी यात्रा भव्य उत्साहात
प्रतिनिधी / ओझर :
नाशिकपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर बानगंगा नदीकाठी वसलेले ओझर हे श्री खंडेराव महाराजांचे पवित्र स्थल असून पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे खंडोबा मल्हारी हे नवसाला पावणारे जागृत दैवत म्हणून ओझर परिसरात विशेष प्रसिद्ध आहे. येथे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला साजरी केली जाणारी चंपाषष्ठी यात्रा ही दोनशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा जपणारा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक सोहळा आहे.
चंपाषष्ठीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे संबोधले जाते. या दिवशी खंडेराव महाराजांनी मणिमाल्याचा वध करून धर्मसंस्थापना केली, अशी मान्यता आहे. त्यामुळे या यात्रेला अपार धार्मिक महत्त्व लाभले असून सहा दिवस चालणाऱ्या या विधीला षडरात्रोत्सव असेही म्हटले जाते.
सहा दिवस दररोज आरत्या, मल्हार महात्मा ग्रंथाचे पारायण आणि पूजा-विधी पार पाडले जातात. चंपाषष्ठीच्या पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत महाभिषेक केला जातो.
भव्य मंदिर आणि यात्रेचा विस्तार
पूर्वीचे छोटे मंदिर वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे अपुरे ठरू लागल्याने मुंबई-आग्रा महामार्गालगत भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले. ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून उभारलेले हे मंदिर आज ओझरचे आकर्षण बनले आहे.
मंदिरासमोर विशाल सभा मंडप, कासव व नंदीची मूर्ती, घोड्यांच्या समाधी आणि भव्य दीपस्तंभ यात्रेचे वैभव अधोरेखित करतात.
मल्हार रथ – दोनशे वर्षांची अभिमानाची परंपरा
ओझर यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बारागाडे मल्हार रथ — आणि हा रथ ओढण्याचा मान माणसांना नसून घोड्याला आहे. हा अनोखा मान दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे.
अश्वाचे संगोपन करण्याची जबाबदारी परंपरेने आदिवासी समाजाकडे असून यात्रेच्या दिवशी या मानाच्या घोड्यास हळदीची पारंपरिक आंघोळ घालून मंदिर-दर्शन घडवले जाते.
दुपारी वाजत-गाजत गावातून या घोड्याची व पालखीची मिरवणूक काढली जाते. सायंकाळी ५ वाजता घोड्यास बारागाडेजवळ आणून त्याच्या गळ्यात दोराचे कडे घालून रथ ओढण्याचा सोहळा पार पडतो.
या वेळी परिसर भंडाऱ्याच्या उधळणीने, “येळकोट येळकोट जय मल्हार!” या जयघोषांनी दुमदुमून जातो. भाविकांची श्रद्धा अशी की महाराज स्वतःच घोड्यास रथ ओढण्याची प्रेरणा देतात.
विविध मानकरी व सेवा परंपरा
या यात्रेत सेवा करण्याचा मान विविध घटकांना दिला जातो—
भगत, चोपदार, घोडेवाले, पालखीवाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई, हरदास, शिंगवाले व वाघोजी.
सजलेले रथ आणि कसरतींची मोहक प्रदर्शने
यात्रेत भाग घेणारे सर्व रथ कलात्मक सजावट, नक्षीकाम आणि उंच लाकडी खांबांनी सजलेले असतात. खांबावर लोखंडी रिंग व चाक बसवून ‘चोपा’ तयार केला जातो आणि त्यावर तरुण मल्ल ‘झुलता फिरता मल्लखांब’ सादर करतात.
प्रत्येक तालीम संघ आपल्या रथासह वाद्य-वृंदासह मिरवणूक काढतो. तरुणाई नृत्य-गाण्यांतून यात्रेचा आनंद लुटते.
जागरण-गोंधळ, कुस्ती दंगल आणि लोककलेची मेजवानी
यात्रेच्या रात्री मंदिरासमोर जागरण-गोंधळ आयोजित केला जातो. भगत जन शासकीय कलगी-तुर्याची महती गातात.
दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम व दुपारी भव्य कुस्ती दंगल होते. महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत पैलवान यात सहभागी होऊन बक्षिसे जिंकतात.
तसेच विविध तमाशा मंडळे, लोककला कार्यक्रम, मौत का कुआ, जादूची नगरी, पाळणे, खेळणी व मिठाईची दुकाने यात्रेला रंगत आणतात.
कडक व्यवस्था आणि प्रशासकीय नियोजन
यात्रेचे नियोजन नगरपरिषद, यात्रा समिती, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करतात. लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडते.
