तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे मैदानात; राज्य सरकारला सुनावले खडे बोल
नाशिक तपोवनमध्ये होणाऱ्या साधुग्रामवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तपोवनमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीला स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर. अनेक राजकीय नेते याविरोधात मैदानात उतरले. आता अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी देखील तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची (Nashik) भावना समजून घेतली पाहिजे. झाडं ही आमची आई-बाप आहेत, आणि त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. तपोवनमध्ये काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत. तपोवनमधील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन उभा राहिलंय, त्याला माझा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
तपोवनमधील लहानात लहान झाड देखील तोडता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. येथे साधू आले काय आणि गेले काय याने मला फरक पडत नाही. मात्र झाडं राहिली पाहिजे. याविषयी माझा अभ्यास नाही. मात्र झाडं गेली तर नाशिककरांच नुकसान होईल. अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कस म्हणायचं. शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष असलेली सगळ्यात जास्त वडाची झाडं कोणी तोडली असतील तर ती या सरकारनं तोडली. आपल्याला झाडांची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं महाराष्ट्र (Maharashtra) सरकारला जमलेलं नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे, ते म्हणजे झाड. त्यामुळे ही झाडं तोडू नका मला केव्हा पण बोलवा मी येईल. आज देखील मी नाशिककरांसाठी येथे आलो असल्याचं यावेळी सयाजी शिंदे यांनी सांगितलं.
