वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षानिमित्त माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे सामूहिक गायन
नाशिक, उंटवाडी (प्रतिनिधी) — नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करून देशभक्तीची भावना जागवली.
कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मोंढे प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कापसे यांनी भूषविले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. विजय मापारी, पर्यवेक्षक श्री. सूर्यभान जगताप, श्री. शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी श्री. बाळासाहेब आहेर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. कापसे, पर्यवेक्षक श्री. जगताप तसेच श्रीमती मृण्मयी घैसास यांनी वंदे मातरम् या गीताचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शालेय गीतमंचाच्या मार्गदर्शनाखाली — मृण्मयी घैसास, सुनील कुलकर्णी, रसिका कुलकर्णी आणि अबोली अकोलकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे सुमधुर सामूहिक सादरीकरण केले.
कार्यक्रमादरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकला. तसेच विद्यालयात वंदे मातरम् गीताच्या अनुषंगाने चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. शेवटी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मोंढे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व देशभक्तीची भावना सदैव जोपासावी असे आवाहन केले.
