जागतिक चिंतन दिन २०२६: संकल्प आपल्या मैत्रीचा-

 जागतिक चिंतन दिन २०२६: संकल्प आपल्या मैत्रीचा-



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

     आज २२ फेब्रुवारी. हा दिवस दरवर्षी जागतिक चिंतन दिन म्हणून स्काऊट कम्युनिटी मार्फत साजरा केला जातो. २०२६ मध्ये १०० वा जागतिक चिंतन दिन साजरा होत आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम निवडली जाते. २०२६ या वर्षाच्या जागतिक चिंतन दिनाची थीम ‘अवर फ्रेन्डशिप’ अशी आहे. जागतिक चिंतन नेमका का साजरा केला जातो? तो केंव्हापासून साजरा केला जातो? हा दिवस कोणाकडून साजरा केला जातो? त्याचे महत्व काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच सर्वांनाच असेल.


  जगभरातील मुलामुलींत जागतिक बंधुभाव रुजविण्याच्या उद्देशाने रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेजन पॉवेल म्हणजेच बी. पी. या ब्रिटीश सैन्यातील अधिका-याने स्काऊट चळवळीची १९०७ या वर्षी स्थापना केली. त्यासाठी स्काऊट शिक्षणाची कल्पना साकार करण्यासाठी आणि त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी इंग्लंडमधील ब्राऊनसी बेटावर २० मुलांचा पहिले निसर्ग निवासाचे शिबीर देखील घेतले. चार भिंतींच्या बाहेरील निसर्गातील उघड्यावरील जीवन, नेतृत्वाची संधी, संघ कार्य, मैत्री मुलांना जास्त आवडते. मुले गटात त्यांच्याच समवयस्कांच्या नेतृत्वाखाली अधिक चांगले शिकतात; याची प्रचीती बीपींना आली. 


    संभाव्य युद्धाकरिता काही माणसे तयार करून आपण जेवढी देशसेवा करून, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक देशसेवा आपण उगवत्या पिढीला चांगले नागरिक बनण्याचे शिक्षण देऊन करू, असा विचार बीपींच्या मनात डोकावला आणि त्यांनी आपल्या सैनिकी जीवनाचा राजीनामा देवून स्काऊट चळवळीच्या मार्फत जगाच्या सेवेचा मार्ग आरंभला. बीपींना जगाचे मुख्य स्काऊट मानले जाते. मुलांसाठी स्काऊट तर मुलींसाठी गर्ल गाईडची सुरुवातही बीपींनी केली. त्यांच्या पत्नी लेडी बेडन पॉवेल यांनी बीपींना स्काऊट चळवळीच्या कार्यात सदैव साथ दिली. म्हणून पुढे चालून बीपींनी लेडी बेडन पॉवेल यांना जगाच्या मुख्य गर्ल गाईड म्हणून नेमले. जगातील बहुतेक देशांत आज स्काऊट आणि गाईड चळवळ मानव सेवेचे कार्य करीत असून त्यात लक्षावधी सदस्य सहभागी झालेले आहेत.


    गर्ल गाईडची वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड आणि गर्ल स्काऊट (WAGGGS) ही अधिकृत संस्था आज लेडी बेडन पॉवेल यांचे कार्य पुढे नेटाने चालवत आहे. १९२६ मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड आणि गर्ल स्काऊटची ४ थी जागतिक परिषद युएसमधील गर्ल स्काऊटस ऑफ दि युनायटेड स्टेट्स कॅम्प एडिथ मेसी येथे भरली होती. या परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी एका विशेष आंतरराष्ट्रीय दिवसाच्या आवश्यकतेची मागणी केली. जगभरातील गर्ल गाईडिंग आणि गर्ल स्काउटींगच्या प्रसाराबद्दल आणि जगभरातील सर्व गर्ल गाईड्स आणि गर्ल स्काउट्सना ते करीत असलेल्या मानवाच्या सेवेविषयक कार्यासाठी धन्यवाद देवून त्यांचे कौतुक करू शकतील; हा त्यामागचा हेतू होता.


    चर्चेअंती २२ फेब्रुवारी हा तो दिवस असेल असे सर्वांचे एकमत झाले. कारण हा दिवस स्काऊट चळवळीचे संस्थापक बीपी आणि जगाच्या मुख्य गर्ल गाईड लेडी बेडन पॉवेल या दोघांचाही जन्मदिवस. या दिवसाला थिंकिंग डे असे संबोधण्यात आले. तेंव्हापासून WAGGGS मार्फत २२ फेब्रुवारी हा दिवस थिंकिंग डे म्हणून साजरा करण्यास प्रारंभ झाला तो आजतागायत सुरु आहे. 


  १९९९ मध्ये आयर्लंड मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड आणि गर्ल स्काऊटची ३० वी जागतिक परिषद पार पडली. या परिषदेत वर्ल्ड थिंकिंग डे असे या दिवसाचे नामकरण करण्यात आले. मैत्री, सांस्कृतिक देवाणघेवाण, महिला सक्षमीकरण, जागतिक समस्यांवर विचार करण्यासाठी वर्ल्ड थिंकिंग डे साजरा केला जातो. जगभरातील मुलींना एकत्र आणणे, त्यांना सशक्त बनविणे, जागतिक समस्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन जगभर आयोजित केले जातात. वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड आणि गर्ल स्काऊट जगभरातील १४६ देशांतून १० मिलियनहून जास्त सदस्यांना सोबत घेवून जागतिक चिंतन दिन साजरा करीत आहे.Our Friendship ही चालू वर्षाच्या जागतिक चिंतन दिनाची थीम आहे. जगभरातील मित्र मैत्रिणींची मदत आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. जगभरात मानवसेवेचे व्रत अंगिकारलेल्या आपल्या बंधू आणि भगिनी यांच्या विषयी या दिवशी विचार करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यातून एकमेकांप्रती जिव्हाळा, प्रेम वृद्धिंगत करून वेगवेगळ्या कारणांनी द्वेषाच्या बाजूला झुकणारा मनाचा लंबक फिरून सदसदविवेकबुद्धी, प्रेमाचे औदार्य आणि सेवावृत्ती यांच्या बाजूला फिरविण्याची संधी या दिवसामुळे जगभरातील स्काऊट-गाईड्सला मिळते. परिणामी जगभरातील स्काऊट-गाईड्स मध्ये आपण एकाच कुटुंबातील असल्याची भावना जागृत होते एकमेकांप्रती कणव, सौहार्दता, संवेदनशीलता निर्माण होते.पोलंडमध्ये भरलेल्या ७ व्या जागतिक परिषदेत एका बेल्जियम प्रतिनिधीने जागतिक चिंतन दिनी मुलींची प्रशंसा आणि मैत्री केवळ शुभेछान्पुर्तीच मर्यादित नसावी अशी भुमिका मांडली. त्यासाठी स्वयंसेवी निधीचे संकलन करून त्यातून मुलीना भेटवस्तू देवून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे. हा विचार लेडी बेडन पॉवेल यांनी अंमलात आणला. त्यासाठी त्यांनी गर्ल गाईड आणि गर्ल स्काऊटला एक पत्र लिहून तुमच्या विचारांसाठी एक पैसा देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; जो आजही निरंतर आणि निस्वार्थी भावनेतून सुरु आहे. ज्या निधीतून जगभरातील अनेक गरजू बहिणींचा विचार होतो. गेले शतकभर हा इतरांचा विचार करण्याचा संवेदनशील निर्झर अखंड वाहतो आहे.


   विविधतेत एकता कशी जपावी, समाजासाठी योगदान देणे का आवश्यक आहे, जागतिक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय अशा प्रश्नावर आपल्या मुलामुलींना विचार करायला प्रवृत्त करण्याची संधी जागतिक विचार दिन देतो. त्यातून बंधुभाव, सहिष्णुता, सेवावृत्ती, जागतिक प्रश्नाबंद्दल जाणीव आणि उत्तरदायित्व निर्माण करणे हे लक्ष्य साध्य करता येवू शकते; ज्यात अखंड मानवजातीचे हित दडलेले आहे. चला तर मग आपणही या दिवशी जगाचे मुख्य स्काऊट बीपी आणि जगाच्या मुख्य गर्ल गाईड लेडी बेडन पॉवेल यांच्या विचारांतील जागतिक मैत्रीचा परीघ वाढविण्याचा संकल्प या जागतिक चिंतन दिनी आपण सर्वजण करूया!


 


- श्री नवनाथ फकिरा वाघचौरे
          एल.टी.(स्का)
जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्का), नाशिक

Previous Post Next Post