शिवमय वातावरणात पेठे विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात”
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, रविवार करंजा, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, प्रमुख अतिथी बापू चव्हाण, भाऊसाहेब नेहरे व पालक-शिक्षक संघाच्या कराड मॅडम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन करून झाली.
शिवजयंतीनिमित्त शाळेत दोन्ही सत्रात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी बापू चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्रातील ऐतिहासिक प्रसंग प्रभावीपणे उलगडले. त्यांनी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची संकल्पना, जिजाऊंनी दिलेले संस्कार, आदिलशाही व मुघल सत्तेविरुद्ध उभारलेला लढा, तसेच अफजलखान व शाईस्तेखान यांसारख्या शत्रूंवर मिळवलेले पराक्रम यांचा उल्लेख केला. विशेषतः अफजलखान वध, शाइस्ता खान यांच्यावरची कारवाई आणि स्वराज्य स्थापनेची शपथ या घटनांनी विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमानाची भावना जागवली.कार्यक्रमात महाराजांच्या सहकाऱ्यांचा उल्लेखही करण्यात आला. सिंहगडाच्या लढाईतील शौर्य गाजवणारे तानाजी मालुसरे, पावनखिंडीत पराक्रम गाजवणारे बाजीप्रभू देशपांडे तसेच दूरदृष्टी असलेले प्रशासन, आरमार उभारणी, किल्ले बांधणी, जलव्यवस्थापन यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा उल्लेख करून स्वराज्य ही लोककल्याणकारी संकल्पना होती,हे अधोरेखित करण्यात आले.पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण स्पष्ट करून शिवचरित्र वाचनातून व्यक्तिमत्त्व घडते,असा संदेश त्यांनी दिला.तर भाऊसाहेब नेहरे मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करत शिवकालीन इतिहासातील वस्तुनिष्ठ संदर्भ मांडले.व रूपाली ठाकूर मॅडम यांनी पोवाड्यांमधून आणि लोकपरंपरेतून शिवचरित्र जिवंत राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनीही विविध सादरीकरणांद्वारे कार्यक्रम रंगतदार केला. ओवी कुलकर्णी हिने जिजाऊंची वेशभूषा करून महाराजांच्या जीवनावरील पाळणा व श्लोकांच्या माध्यमातून ऐतिहासिक प्रसंग सादर केले. रुद्र खैरे याने अफजलखान वधाचा पोवाडा व ओमकार देवरे यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. हार्दिक पुराणिक, सर्वेश शेलार (शिवाजी महाराज), ओवी कुलकर्णी,प्राची गुप्ता (जिजाऊ) व जयाद्री जाधव (सेवेकरी) यांनी साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. प्रेमांशू तमखाने, वेद प्रयागे, यज्ञेश देशमुख, अवधूत देवरगावकर व भार्गव नटवे यांनी विद्यार्थीय भाषणातून शिवचरित्राचे महत्त्व मांडले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी महाराजांचे विचार आचारात आणण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार व राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक भाऊसाहेब भोंडवे, महेंद्र गावित, विकास खंबाईत यांचा गौरव करण्यात आला. कलाशिक्षक मनीष जोगळेकर, रुपाली रोटवदकर आदी गुरुजनांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड यांनी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी चे महत्व विशद करून केले. सूत्रसंचालन संस्कृती आबडे व कृष्णा राजपूत,श्लोक करपे यांनी तर आभार प्रदर्शन उमेश देवरे व प्रिया शिंपी यांनी मानले . कार्यक्रमास शाळेतील सर्व गुरुजन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजयंती निमित्त संपूर्ण विद्यालय परिसर “जय शिवराय” घोषणांनी दुमदुमला आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वराज्य,शौर्य व संस्कारांचा दीप प्रज्वलित झाला.

