एली’चा प्रेरणादायी संदेश : पेठे विद्यालयात प्राण्यांप्रती करुणेची जागर”

 एली’चा प्रेरणादायी संदेश : पेठे विद्यालयात प्राण्यांप्रती करुणेची जागर



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आशियातील पहिला ॲनिमेट्रोनिक हत्ती ‘एली’ याच्या विशेष भेटीचा कार्यक्रम दोन्ही सत्रांत उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व कार्यवाह शैलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

हा कार्यक्रम PETA India (People for the Ethical Treatment of Animals – India) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे पदाधिकारी किरण कानथे, मीनल शहा व पटा टीम उपस्थित होती.

‘एली’ हा सुमारे ६ फूट उंच रोबोटिक हत्ती असून प्राण्यांप्रती दयाळूपणा, सहानुभूती व नैतिकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी भारतभर प्रवास करतो. मे २०२३ मध्ये पेटा इंडियातर्फे तयार करण्यात आलेला हा ॲनिमेट्रोनिक हत्ती शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या संरक्षणाचा संदेश देतो. कार्यक्रमादरम्यान एलीने डोळे मिचकावणे, कान हलवणे अशा हालचाली करून विद्यार्थ्यांना आकर्षित केले.

हत्तींचा वापर स्वार्‍यांसाठी किंवा सर्कसमध्ये केल्यास त्यांना होणाऱ्या वेदना व त्रास याबाबतची माहिती या सादरीकरणातून देण्यात आली. या कथनासाठी अभिनेत्री व प्राणीसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या दिया मिर्झा यांचा आवाज वापरण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा अधिक प्रभाव पडला.

संस्थेच्या कार्याबाबत माहिती देताना प्राणी हक्कांचे संरक्षण, जनजागृती व शिक्षण, कायदेशीर हस्तक्षेप, संशोधनाला पर्याय, फॅशन व मनोरंजन क्षेत्रातील सुधारणा तसेच वनस्पती-आधारित जीवनशैलीचा प्रचार यांसारख्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना “प्राणीही संवेदनशील जीव आहेत” ही जाणीव करून देत त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याचे आवाहन करण्यात आले. रस्त्यावरील व पाळीव प्राण्यांना त्रास न देणे, शक्य असल्यास अन्न-पाणी देणे, प्राणी -आधारित वस्तूंचा वापर टाळणे अशा संदेशांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची बीजे रुजवली.

या उपक्रमाला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.

Previous Post Next Post