“कुष्ठरोगाविरुद्ध जनजागृतीची चळवळ : पेठेच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्या द्वारे सादरीकरण”
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक (प्रतिनिधी) –
सहाय्यक संचालक कुष्ठरोग व पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक, नाशिक तसेच लेप्रसी ट्रेनिंग सेंटर, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिरावाडी रोड, पंचवटी येथील व्होकेशनल लेप्रसी ट्रेनिंग सेंटरच्या प्रांगणात कुष्ठरोग विषयावर जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.
या पथनाट्याद्वारे कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून योग्य माहिती देण्याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. पथनाट्याचे स्क्रिप्ट कुष्ठरोग तंत्र सहाय्यक म.न.पा. नाशिकचे अभय नाकील व राकेश कांबळे यांनी लिहिले होते. कार्यक्रमास पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक नाशिक येथील वैद्यकीय अधिकारी योगिता पाटील, व्होकेशनल लेप्रसी ट्रेनिंग सेंटर पंचवटीचे प्रिन्सिपल विजय पट्टा यांच्यासह सुपरवायझर राजीव नेमाडे, महेश निकुंभ तसेच कुष्ठरोग तंत्र सहाय्यक अभय नाकील, किरण आठवले, शेखर गांगुर्डे, जितेंद्र बोरसे, दत्तू चव्हाण आदी उपस्थित होते.
तसेच शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात कुष्ठरोग तंत्र सहाय्यक अभय नाकील यांनी पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणे, उपचारपद्धती व गैरसमजुती याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून ३० गुणांची कुष्ठरोग विषयक प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आली. इयत्ता नववीतील २५ विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग जनजागृती विषयावरील प्रश्नमंजुषा (लेखी) स्पर्धेत सहभाग नोंदविला.
या सर्व उपक्रमांतर्गत एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे व कल्पना खालकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुष्ठरोगाविषयी जागरूकता वाढून समाजात सकारात्मक संदेश पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
.jpg)