नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनास उत्साहात सुरुवात
नाशिक : महाराष्ट्र शासनच्या मराठी भाषा मंत्रालयाच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या नाशिक येथील आवारात विश्व मराठी साहित्य संमेलन भव्यदिव्य स्वरूपात सुरू झाले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, संवाद, कार्यशाळा तसेच भाषा व संस्कृतीविषयक प्रदर्शनांचा समावेश आहे.
या संमेलनात नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांपैकी वारसा स्थळ असलेल्या विजयदुर्ग किल्लाची पर्यावरणपूरक प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली आहे. चित्रकला शिक्षक मनीष जोगळेकर, संजय अहिरे व कैलास टोपले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरून ही देखणी प्रतिकृती साकारली असून, ती प्रदर्शनातील केंद्रबिंदू ठरली आहे.दरम्यान, संमेलन तीन दिवस चालणार असून, संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील अधिकाधिक शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी पाठवावे, असे आवाहन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले आहे.
