विश्व मराठी साहित्य संमेलनात पेठे विद्यालयाची कलात्मक मोहोर; विजयदुर्ग किल्ल्याची देखणी प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू

 विश्व मराठी साहित्य संमेलनात पेठे विद्यालयाची कलात्मक मोहोर; विजयदुर्ग किल्ल्याची देखणी प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नाशिक (प्रतिनिधी)

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आवारात सुरू असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांपैकी ऐतिहासिक वारसा असलेल्या विजयदुर्ग किल्ला याची भव्य व पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे.ही प्रतिकृती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षक मनीष जोगळेकर, संजय अहिरे व कैलास टोपले यांच्या मार्ग-दर्शनाखाली तयार केली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून उभारलेला हा किल्ला अत्यंत देखणा असून प्रदर्शनात तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात ही प्रतिकृती पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या.या कलाकृतीस विशेष महत्त्व प्राप्त झाले ते संमेलनादरम्यान झालेल्या मान्यवरांच्या भेटींमुळे. प्रसिद्ध अभिनेत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सौभाग्यवती नीलमताई शिर्के-सामंत यांनी प्रतिकृतीस सदिच्छा भेट देत किल्ल्याविषयी माहिती जाणून घेतली.प्रसंगी संस्था पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व सहकार्यवाह शैलेश पाटोळे, विजय मापारी, बि डी. आहेर. प्रशांत साबळे यांनी कलाशिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.इतिहास, कला आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुरेख संगम साधणारी पेठे विद्यालयाची ही उपक्रमशील मांडणी संमेलनातील एक उल्लेखनीय ठळक बाब ठरली आहे.

Previous Post Next Post