राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पथनाट्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
नाशिक (प्रतिनिधी)
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, नाशिक येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आयोजित पथनाट्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच शालेय प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.
दि.०४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्होकेशनल लेप्रसी ट्रेनिंग सेंटर, पंचवटी येथे आयोजित कुष्ठरोग जनजागृती पथनाट्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच दि.०७ फेब्रुवारी २०२६ रोजी पेठे विद्यालयात कुष्ठरोग विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. योगिता पाटील (वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक, नाशिक) उपस्थित होत्या. कार्यक्रमास राजीव नेमाडे (सुपरवायझर) व अभय नाकील (कुष्ठरोग तंत्रज्ञ, नाशिक महानगरपालिका) यांची उपस्थिती लाभली होती. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे होते. उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,सहकार्यवाह शैलेश पाटोळे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व श्रीमती कल्पना खालकर मॅडम यांचा गौरव करण्यात आला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक
१) मयंक प्रसाद ठाकूर (इ.९ वी – ब)
२) श्रावणी सुनिल सारस्वत (इ.९ वी -अ)
३) कृष्णा संतोष राजपूत (इ.९ वी –ब)
डॉ.योगिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपचारपद्धती, आवश्यक आरोग्यविषयक काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून शासकीय रुग्णालयांमध्ये त्यावरील मोफत उपचार उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. समाजातील गैरसमज दूर करून २०२७ पर्यंत संसर्ग साखळी तोडण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा व सर्वेक्षण उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सक्रिय सहभाग व उत्कृष्ट कार्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी व गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत- प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभाराचे निवेदन कल्पना खालकर यांनी केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती निर्माण होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.
.jpg)