पेठे विद्यालयात इयत्ता दहावीचा आशीर्वाद समारंभ उत्साहात संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, नाशिक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा(आशीर्वाद) समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ना.शि.प्र. मंडळाचे सहकार्यवाह तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी मिलिंद कचोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, पालक-शिक्षण संघाचे पदाधिकारी वर्षा कराड, ज्योती कराड, कविता महाले तसेच शालेय पंतप्रधान गौरव अढांगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मिलिंद कचोळे यांनी माजी विद्यार्थी म्हणून विद्यालयाशी असलेली जिव्हाळ्याची नाळ व्यक्त करताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा अभिमान बाळगावा,असे आवाहन केले.मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हा भक्कम पाया ठरतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.“मोठ्या विश्वात प्रवेश करताना विविध मित्र भेटतील;मात्र स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून यश संपादन करा,”असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र निकम यांनी नियमित अभ्यास,जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांचे महत्त्व अधोरेखित केले.अपयशाने खचून न जाता ध्येय निश्चित करून प्रयत्नशील राहावे,योग्य करिअरची निवड करावी व कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जावे,असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय व सत्कार निवेदन प्रशांत साबळे यांनी केले. कार्यवाह राजेंद्र निकम यांनी प्रमुख अतिथीं मिलिंद कचोळे यांचा सत्कार केला, उमेश देवरे यांनी शिक्षक मनोगतातून परीक्षेसंदर्भातील मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थी श्रीदत्त आहिरे, प्रभंजन रत्नाकर व अनुष्का मोरे यांनी शालेय जीवनातील अनुभव कथन करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मीनल पत्की व रूपाली धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायकवृंदाने “आशाएँ – कुछ पाने की” हे स्वागतगीत सादर करून छान अशी वातावरण निर्मिती केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नेहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड यांनी केले.समारंभानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व शुभेच्छापत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास वर्गशिक्षक प्रशांत साबळे, बापू चव्हाण, उमेश देवरे, भाऊसाहेब नेहरे यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

