हनी बी गार्डन शैक्षणिक सहल — उत्साह, ज्ञान आणि निसर्गसंपन्न अनुभवांची बहार!
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयामधील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची बहुप्रतीक्षित शैक्षणिक सहल दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी पिंपळगाव बसवंत येथील हनी बी गार्डन येथे उत्साहात पार पडली. शाळेतील सकाळ व दुपार सत्रातील एकूण विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणात या सहलीत सहभागी होऊन निसर्ग, विज्ञान आणि सामूहिक शिक्षणाचा अनोखा अनुभव घेतला.या सहलीचे मार्गदर्शन मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी तसेच सहकार्यवाह शैलेश पाटोळे व गुरुजणांनी केले. त्यांच्या योग्य नियोजनामुळे व संवेदनशील देखरेखीमुळे संपूर्ण सहल सुरक्षित, आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरली.हनी बी गार्डनमध्ये विद्यार्थ्यांनी मधमाश्यांचे जीवनचक्र, परागीकरणाचे महत्त्व, मधनिर्मिती प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळवली. मार्गदर्शकांनी दिलेल्या सोप्या आणि रोचक प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल अधिक वाढले. निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी खेळ, साहसी क्रिया, समूह उपक्रम यांतही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.सहलीत अनुभवलेले ज्ञान, आनंद आणि सहकाराची भावना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच हातभार लावणारी ठरली. पेठे विद्यालयाची ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवणारी ठरली.
.jpg)