सागरमल मोदी शाळेमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक: येथील सागरमल मोदी विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे, ज्येष्ठ शिक्षिका नीलिमा गायधनी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कोमल जोशी उपस्थित होत्या.
ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा घुले यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. उपस्थितांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी “विजयी विश्व तिरंगा प्यारा” हे ध्वजगीत तसेच “गर्जा महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत सादर केले.
विद्यालयातील स्काऊट विभागाच्या वतीने शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे यांच्या हस्ते स्काऊट ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी “भारत स्काऊट गाईड झंडा” हे गीत सादर झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे संविधान प्रास्ताविक – ‘आम्ही भारताचे लोक’ याचे वाचन केले. असाक्षर मुक्त गाव प्रतिज्ञा प्राजक्ता क्षीरसागर यांनी दिली.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीत “आता उठवू सारे रान! आता पेटवू सारे रान” (साने गुरुजी) सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी
संगीत कवायतीचे सादरीकरण केले.
इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. कस्तुरी कुलकर्णी, देवांशी तांबोळी, पूर्वा परदेशी, राजवी वाघमारे, दुर्वा उघडे व पारस खेत्रे यांनी आत्मविश्वासपूर्ण भाषणांतून देशप्रेम व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक व संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी आपल्या संदेशात संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी प्रभावीपणे केले.कार्यक्रमाच्या शेवटी २६ जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

