ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन..
ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेचा पुढाकार.
नगरपरिषद,वनविभाग, बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांनी घेतला सहभाग.
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
ओझर:- मकरसंक्रात सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरु असताना नायलॉन मांजा वापरल्याने त्याचे दुष्परिणाम निसर्गाला व मानवाला सहन करावे लागतात.पतंग तुटल्यावर मांजा झाडावर व रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पक्षी व माणसाला इजा होते तर काहींचा जीव जातो यास्तव नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकाराने आयोजित करुन ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.
मुख्य वन संरक्षक जी. मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वनविभागा चे उप वनसंरक्षक राकेश सेपट सामाजिक वनिकरण चे उप वनसंरक्षक गणेश रणदिवे,मनमाड सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाणे,वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा.)विशाल कुटे व सुनील भिलावे (सा.व), ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे,मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेघडमल यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्था, चांदवड वनपरीक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक,ओझर नगरपरिषद,मविप्र समाजाचे कै. माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे आयोजन करण्यात आले.
येथील सावित्रीबाई फुले चौक (गडाख कॉर्नर) येथून नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्ग बस स्टॅन्ड मार्गे भगवा चौक, तांबट गल्ली, चांदणी चौक, मिलिंद नगर (राजवाडा), महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड मार्गे पुन्हा पोलीस चौकी या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली.फेरी दरम्यान “नायलॉन मांजा वापरू नका”, “पक्षी वाचवा – निसर्ग वाचवा”, “पतंग उडवा, जीव घेऊ नका” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सूती मांजा वापरण्याचे आवाहन केले. संस्था व शाळे बरोबर, वनविभाग व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नायलॉन मांजा विकणे,वापरणे कायद्याने गुन्हा आहे असे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले व सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडाचे रोप, पुस्तक व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला.
यावेळी ओझर नगरपरिषद,चांदवड (प्रा) व सामाजिक वनिकरन निफाड व नाशिक,ओझर पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी व ए.आर.इ.ए.एस.फाउंडेशन संचालक व सदस्य, नवनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक,तसेच बोरस्ते विद्यालया चे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थीनी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.या जनजागृती उपक्रमामुळे ओझर गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनीही या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
चौकट :- ओझर नगरपरिषदेत प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांचा पहिल्या जनजागृती कार्यक्रमात सहभाग...
नुकत्याच पार पडलेल्या ओझर नगरपरिषदेतील निवडून आलेले नगरसेवकांनी फेरीत सहभाग घेतल्याने पदभार स्विकारल्या नंतर चा पहिलाच सार्वजनिक जनजागृती फेरी चा कार्यक्रम असल्यामुळे ओझर गावाच्या इतिहासात तशी नोंद घेतली जाईल.
