सी डी ओ मेरी शाळेचा ४७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सीडीओ मेरी शाळेने ४७ व्या वर्षात पदार्पण केले. त्याप्रसंगी उत्साही आणि आनंदी वातावरणात शाळेच्या प्रांगणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मेरीच्या स्थापत्य विभागाचे उपविभागीय अभियंता केदार चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी व शाळेच्या माजी विद्यार्थीनी थर्मल पॉवर स्टेशन, नाशिक येथे सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या प्रतीक्षा चौधरी ह्या उपस्थित होत्या.
उभयतांनी विद्यार्थ्यांना, गुरुजनांना व संस्था पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "शाळा आपल्याला जीवनात खूप काही शिकवते, ह्या शाळेने देखील अनेक नामवंत, कीर्तीवंत विद्यार्थी घडवले आहेत आणि ही उज्वल परंपरा आजही टिकवून आहे याचा अभिमान वाटतो." असे प्रतिपादन केदार चौधरी यांनी केले. माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेच्या जुन्या आठवणी सांगून शाळेची एक विद्यार्थीनी ते आज शाळेच्या वर्धापनदिनी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी हा सतरा वर्षांचा प्रवास खूप आनंद देणारा असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यार्थी, पाहुणे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, शालेय समिती अध्यक्ष मोहन रानडे, कार्यवाह राजेंद्र निकम, सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून आनंद व्यक्त केला. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक चिमण सहारे, पर्यवेक्षक साहेबराव राठोड, सुनील घोलप, पा.शि.संघाच्या कार्यध्यक्षा देवयानी सोनार, सदस्य रवींद्र जगताप, शालेय पंतप्रधान अनुजा पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर अतिथींचा परिचय पा.शि.संघाचे कार्यवाहक मंगेश बोढाई यांनी करून दिला. ज्येष्ठ शिक्षिका यशश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर साहेबराव राठोड यांनी आभार मानले.

