पेठे विद्यालयाचा १०३ वा नवा पेशवे वाडा दिन व वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिक (प्रतिनिधी) – शिक्षण क्षेत्रात अविरत कार्यरत व यशस्वी वाटचाल करणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटी या नामवंत संस्थेच्या पेठे विद्यालयाचा १०३ वा नवा पेशवे वाडा दिन तथा वर्धापन दिन (१५ जानेवारी) हा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संजय पाटील व सुप्रसिद्ध उद्योजक प्रमोद रानडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके हे होते.कार्यक्रमास व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, जयदीप वैशंपायन, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, कर्नल आनंद देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, शिक्षण मंडळ अध्यक्षा नंदा पेठकर, कार्यकारी मंडळ सदस्या रंजना परदेशी, के. डी. चौधरी, नवनिर्वाचित नगरसेवक शाहू महाराज खैरे, गुरुमितसिंग बग्गा, संध्याताई कुलकर्णी, अजिंक्य साने, छाया देवांग, भूषण राणे, बबलू शेलार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, संजय बिरारी, नरेंद्र मोहिते, पालक-शिक्षक संघ पदाधिकारी वर्षा कराड, ज्योती कराड, महाले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. शालेय गीतमंचाद्वारे “गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु मंत्र आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा” या गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी केले. सत्काराचे निवेदन व प्रमुख अतिथींचा परिचय सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी करून दिला. संस्थाध्यक्ष दिलीप फडके यांच्या हस्ते प्रमुख अतिथी व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका संध्याताई कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेमुळे संस्कार व समर्पणाची भावना निर्माण होते, असे सांगितले. मराठी माध्यमाचे महत्त्व विशद करत मोठी स्वप्ने पाहा, ध्येय ठरवा व ते साध्य करण्यासाठी जिद्द, कष्ट व मेहनत आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरसेवक शाहू महाराज खैरे यांनी आपल्या राजकीय जीवनातील प्रवासात शाळेतील संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुमितसिंग बग्गा यांनी मराठी वाङ्मयाचे महत्त्व, मातृभाषेतून मिळणारे शिक्षण व शाळेने दिलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या पायाभरणीसाठी किती आवश्यक आहेत, हे प्रभावी शब्दांत सांगितले.प्रमुख अतिथी व शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर संजय पाटील यांनी “विद्या यश सुखकरी” या ब्रीदवाक्याच्या आधारे शिक्षणाचा वैद्यकीय क्षेत्रात झालेला उपयोग सांगत शालेय आठवणींना उजाळा दिला. सहली, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा क्षेत्रातील सहभाग यामुळे व्यक्तिमत्त्व घडते, असे नमूद करून विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्याचा संदेश दिला. सुप्रसिद्ध उद्योजक व माजी विद्यार्थी प्रमोद रानडे यांनीही शालेय जीवनातील रम्य आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्कारांचे बळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते, असे मत व्यक्त केले.नवा पेशवे वाडा दिन तथा वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या हस्तकला, चित्रकला, गणित विज्ञान प्रदर्शन व सेन्सर वर्किंग कोडिंग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अटल टिंकरिंग लॅब उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या काही निवडक ऍक्टिव्हिटीज आजच्या कार्यक्रम प्रसंगी सादर करण्यात आल्या.या उपक्रमासाठी कल्पना खालकर, रूपाली रोटवदकर, मनीष जोगळेकर व उमेश देवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक, नवनिर्वाचित नगरसेवक,माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतगौरी सराफ यांनी केले, तर आभार संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी मानले.
