सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत माता मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
दि.१९/०१/२०२६
नाशिक (प्रतिनिधी) :
सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, नाशिक येथे आयोजित माता मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमात क्रांती बोराटे यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर संस्था कार्यवाह तथा मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी स्वागत व प्रास्ताविकातून मातृशक्तीचे समाजातील व शिक्षणातील महत्त्व अधोरेखित केले.
प्राजक्ता क्षीरसागर यांनी मान्यवर अतिथींचा परिचय करून त्यांचा सत्कार केला. यानंतर दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन व त्यांच्या सहकार्यांनी “अवघा रंग एक झाला” ही प्रभावी अभिवाचनपर नाटिका सादर केली, ज्यास उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष रंजना परदेशी होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महिलांच्या सहभागाचे व सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले.याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरूडे, विजया दुधारे, शालिनी बच्छाव, नीलिमा गायधनी तसेच पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कोमल जोशी उपस्थित होत्या.दिपाली पाटील यांनी मनोरंजनात्मक खेळ घेतले. या खेळांमुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. याप्रसंगी उपस्थित सर्व माता-भगिनींना तिळगुळ वाटप करून हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मनिषा कापसे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुषमा यादव यांनी केले. कार्यक्रमास माताभगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली.

